भगतसिंग


                                                            jagtappravin. blogspot. com

           

    🌺 भगतसिंग 🌺

टोपणनाव: भागनवाला
जन्म: २७ सप्टेंबर १९०७
ल्यालपूर, पंजाब, ब्रिटिश भारत
मृत्यू: २३ मार्च १९३१
लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: नौजवान भारत सभा
कीर्ती किसान पार्टी
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
पत्रकारिता/ लेखन: अकाली, अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम'
धर्म: शीख
प्रभाव: समाजवाद, कम्युनिस्ट
वडील - सरदार किशनसिंग संधू
आई - विद्यावती

२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे.
      म्हणूनच त्यांना "शहीद-ए-आलम" असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.
         संग्रहालय -
     अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलां येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे.
        एक अलौकिक व्यक्तिमत्त्व -
          भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती.
गुलामी आणि दारिद्र्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे ते एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.
                      स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य -

      ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.
       खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने आरोपपत्र ठेवले.

     भगतसिंगांचे विचार -
        बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
      समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
    समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगैरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.
       हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात:
'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'

   
🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा